सेना पुन्हा भरारी घेण्याच्या मानसिकतेत, तर शिंदे गटाकडून भाजपाच्या माध्यमातून ‘पॅचअप’चा प्रस्ताव!

uddhav thackeray

मुंबई : शिवसेनेत झालेल्या उठावाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याच्या मानसिकतेत आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने पॅचअपचा प्रस्ताव ठेवला असून त्यासाठी भाजपा केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करण्यास त्यांनी सुचविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बाजूला सारले, असे सांगत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावला. नंतर शिवसेनेतील 40 आमदार त्यांना येऊन मिळाले. त्यातूनच खरी शिवसेना कोणाची, हा वाद निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात राज्यातील महिला पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. मी नव्याने सुरुवात करतोय. मी 19 जून 1966च्या मानसिकतेचा आहे, तुम्ही तयार आहात का? तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हते, त्या मानसिकतेतून आपल्याला लढायचे आहे. तुम्ही निवडणुकांकडे लक्ष ठेवा. या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत., असे ते त्यावेळी म्हणाले होते.

पण आता बंडखोर आमदारांनी पॅचअपची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावल्यास तर, आम्ही नक्की जाऊ, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. मातोश्रीचे दरवाजे उघडले तर, मी शिवसेनेत परतेन, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. हाच सूर सुहास कांदे, गुलाबराव पाटील व अन्य आमदारांनी लावला आहे. तर, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही अशीच भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ, पण आम्ही आता भाजपसोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झाले आहे. या कुटुंबामधून परत जायचे असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीही चर्चा करावी लागेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

एकूणच शिंदे गटातील आमदारांचा सूर पाहता ते पुन्हा शिवसेनेत परतण्याच्या तयारीत आहेत. मात्र आता भाजपाशी घरोबा केल्याने त्यांना वेगळी भूमिका घेणे शक्य नाही. हे ध्यानी घेऊनच उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी चर्चा करण्याचे सुचविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी करावी, असे केसरकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपाशी चर्चा करून यावर पडदा टाकतात का? की ताठर भूमिका घेत नव्या चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाता, याकडे सर्वांचे लक्ष आहे.