घरफिचर्सरुग्णांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं- डॉ. अविनाश सुपे

रुग्णांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं- डॉ. अविनाश सुपे

Subscribe

१ जुलै हा दिवस जागतिक डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ज्येष्ठ डॉक्टर अविनाश सुपे यांनी खास माय महानगरच्या रिपोर्टरशी बातचीत केली.

काळानुसार जसजसं तंत्रद्यान बदलत गेलं तसंच डॉक्टर आणि रुग्णांचे संबंधही बदलत गेले. पूर्वी रुग्ण आणि नातेवाईक डॉक्टरांचं म्हणणं ऐकत असत. मात्र, आजकाल रुग्णांच्या डॉक्टरांकडूनच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. प्रत्येकालाच असं वाटतं की रुग्ण रुग्णालयात दाखल झाला की बरा होऊनच घरी आला पाहिजे. तर, दुसरीकडे डॉक्टरांचं संवाद कौशल्य कुठेतरी कमी पडतं असल्याचंही वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांनी नेमकं कशा पद्धतीने काम करायला पाहिजे? किंवा रुग्णांना कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे? हे प्रत्येक डॉक्टरने शिकणं गरजेचं आहे. जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधत माय महानगरने पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांच्याशी याच विषयावर संवाद साधला.

मानसिक तणावाखाली कसं काम करावं? 

याविषयावर माय महानगरशी बोलताना डॉ. सुपे म्हणाले, ”डॉक्टरांनी सर्वात आधी त्यांचं संवाद कौशल्य सुधारलं पाहिजे. अनेकदा डॉक्टर रुग्णाला पुरेसा वेळ देत नाही. पुरेसा वेळ नसल्याकारणाने रुग्णांच्या समस्या समजून घेतल्या जात नाहीत आणि तिथूनच तणावाला सुरूवात होते.” ”दुसरीकडे रुग्णाला नेमका काय आजार आहे याची पूर्वकल्पना डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना देत नाहीत. अशातच जर रुग्ण दगावला तर नातेवाईक चिडतात. त्यातून वाद, हाणामारी सारखे प्रकार घडतात. संपूर्ण रुग्णसेवेला याचा फटका बसतो. अशावेळी डॉक्टरांनी लोकांना समजून घेतलं पाहिजे”, असंही डॉ. सुपे म्हणाले आहे. ”नवोदित डॉक्टरांनी ज्येष्ठ डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. जर‌ रुग्णाला कुठल्याही पद्धतीचा धोका असेल तर नातेवाईक आणि रुग्णाला समजावयला पाहिजे”, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. रुग्ण दगावू शकतो त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे हे ही सांगणं गरजेचं असतं.

- Advertisement -

सुरक्षा वाढवून समस्या सुटणार नाहीत

‘डॉक्टरांवर हल्ले होतात म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, केवळ सुरक्षा वाढवून समस्या सुटणार नाहीत. डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना जगभरात आहेत. यामागे हॉस्पिटलमधील व्यवस्था, रुग्णांचे आजार निदान‌ न होणे अशी बरीच कारणं आहेत.’ असं डॉ. सुपे म्हणाले. याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ”डॉक्टरांचं टीम वर्क खूप महत्त्वाचं आहे. आवश्यकता भासल्यास दोन, तीन डॉक्टरांचं मत घ्यावं. ज्यामुळे डॉक्टरांचं निदान चूकणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाबाबत निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं पाहिजे.  जर एखाद्याला वाटत असेल की दुसऱ्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतले पाहिजेत तर त्याला जाऊ द्यावं.”

रुग्णाचं ऐकून घेणं महत्त्वाचं

‘बऱ्याचदा डॉक्टर ऐकूनच घेत नाहीत अशा तक्रारी येतात. रुग्णाला खूप काही सांगायचं असतं पण डॉक्टर वेळच देत नाहीत. यामुळे रुग्णाच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात डॉक्टरांबाबत विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो. मात्र, डॉक्टरांबाबत नातेवाईकांच्या मनात पूर्ण विश्वास असेल, तर रुग्ण दगावला तरीही ती परिस्थिती ते स्विकारतात. शस्त्रक्रियेत काही अडथळे आले तरी ते समजून घेतात. त्यामुळे मुळातच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी मुळातच डॉक्टरांनी नीट वागलं पाहिजे”, असं मत डॉ.सुपे यांनी व्यक्त केलं.

- Advertisement -

रुग्णसेवा वेठीस धरली जाऊ नये

‘डॉक्टर्सना मारहाण करणाऱ्या लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे. मात्र, कोणा एकाच्या चुकीमुळे संपूर्ण रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होता कामा नये. प्रशासनाशी चर्चा करुन वेळीच समस्या सोडवली पाहिजे. शिवाय प्रशासनानेही डॉक्टरांची बाजू समजून घेत योग्य तो निर्णय दिला पाहिजे. शांतपणे परिस्थिती कशी हाताळता येईल आणि बाकी रुग्णांचा ताण कसा कमी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाने गेल्या ३ वर्षात चांगला पुढाकार घेतला आहे. त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे. अलार्म, सायरन या सुविधा पुरवल्या आहेत. काही गोष्टींमध्ये बदल होण्यासाठी थोडा वेळ लागेल, एका रात्रीत सगळं बदलणार नाही.’ – डॉ. सुपे

‘संप’ हा पर्याय नाही…

माय महानगरशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘एखाद्या डॉक्टरवर हल्ला झाला असेल तर त्याला नक्कीच विश्रांती द्यावी. अशावेळी त्याची जागा दुसऱ्या सिनियर डॉक्टरने घ्यावी आणि आवश्यक ती रुग्णसेवा पुरवावी. ताणतणावाच्या वेळी आपातकालीन सेवा नक्कीच सुरू ठेवली पाहिजे. निषेधच करायचा असेल तर तो काळ्या फिती लावूनही केला जाऊ शकतो. त्यासाठी रुग्णसेवा थांबवण्याची गरज नाही. ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या झाल्याच पाहिजे. सायलेंट मोर्चा काढा, कॅंडल मार्च काढा पण कामबंद आंदोलन करुन रुग्णसेवा बंद करणं योग्य नाही.’

”डॉक्टरांनी प्रशासनापुढे सूसूत्र पद्धतीने आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत. आवश्यकतेनुसारच मागण्या केल्या पाहिजेत. जेणेकरुन त्या मागण्या प्रशासनही गंभीरतेने घेईल. शिवाय ती कामं कशी होतील याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे”, असंही डॉक्टर सुपे यांनी सांगितलं.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -