घरफिचर्सचित्रकार राजा रवि वर्मा

चित्रकार राजा रवि वर्मा

Subscribe

राजा रवि वर्मा हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते. त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राजा रवि वर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रवि वर्मा यांनी काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.

राजा रवि वर्मा यांचा जन्म 29 एप्रिल १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्यांचे वडील मोठे विद्वान व आई कवयित्री होती. राजा रवि वर्मा यांना सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती. त्यांच्या बालपणीच त्यांना महाराज अलियम् तिरुनल या त्यांच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. रवि वर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो चित्रकलेचा वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय तिरुवनंतपुरमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्या प्रोत्साहनामुळे त्याला अधिकच प्रेरणा मिळाली. ते त्रावणकोरचे राजचित्रकार बनले.

- Advertisement -

१८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रवि वर्मा यांनी सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणार्‍या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्यांनी तैलचित्रे काढण्याचे ठरवले. राजा रवि वर्मा यांच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्यांचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्यांनी तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या. राजा रवि वर्मा यांनी चित्रांतील विविध विषयांसाठी भारतभर प्रवास केला. त्याचे ‘दुष्यंत व शकुन्तला’, ‘नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चित्रांनी भारतीयांना त्यांच्या धर्मग्रंथांतील दृश्ये डोळ्यासमोर साकार झाली.

ही त्यांची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली. आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रवि वर्मा यांचे नाव घेतले जाते. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे शिळा (प्रेस) छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रे सार्‍या भारतभर पूजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रवि वर्मा यांनी केले.

- Advertisement -

आपल्या चित्रांतून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणार्‍या रवि वर्मा यांना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळवणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने ‘कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रवि वर्मा यांच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. अशा या महान चित्रकाराचे २ ऑक्टोबर १९०६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -