घरफिचर्ससारांशजागरण - गोंधळ

जागरण – गोंधळ

Subscribe

महाराष्ट्राला लोककलांचा मोठा वारसा लाभलेला आहे. या भूमीतली प्रत्येक लोककला ही समृद्ध करणारी आहे. इथे वेगवेगळ्या भागात राहणार्‍या लोकांचे राहणीमान, नृत्य, गाणी, बोली भाषा, पेहराव आणि एकूणच जीवनमानातून येथील संस्कृतीच दर्शन घडत जात. लोककला संस्कृतीचा हा वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे अभिमानाने पोहोचवला जात आहे. फक्त पोहोचवलाच जात नाही तर तो तितक्याच ताकदीने चालवला जात आहे. यातूनच संपन्न करणार्‍या कलांच प्रतिबिंब आपल्याला महाराष्ट्राच्या मातीत उमटलेल आपल्याला बघायला मिळत. यातीलच एक लोककला म्हणजे ‘जागरण-गोंधळ’ जागरण आणि गोंधळ हे दोन्ही लोककला प्रकार वेगवेगळे असले तरी त्यामध्ये बर्‍यापैकी साम्य आढळतं. खंडेरायाच्या कुलाचारामध्ये जागरण केले जाते. तर, देवीच्या कुलाचारामध्ये गोंधळ घातला जातो.

जागरण

जागरणाचा शब्दशः अर्थ घेतला तर रात्रभर जागून काढणे किंवा जागरण करणे असा होतो. मात्र, देवाला जागृत करण्यासाठी जागरण केलं जातं. प्रत्येक घराण्याला एक कुळधर्म, कुलाचार असतो. आणि तो आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे आपल्या घराण्यात चालत आलेला आहे. श्री खंडेरायाच्या कुलाचारात कुळधर्मचा उद्धार करण्यासाठी. घरातील लग्न, मुंज, घरभरणी अशा शुभकार्य प्रसंगी जागरण केले जाते. रात्रभर घरासमोरील अंगणात वाघ्या – मुरळीच्या साथीने जागरण पार पडते. ही देखील महाराष्ट्रातील एक समृद्ध अशी लोककला आहे. आणि वाघ्या – मुरळी हे यातील लोककलावंत आहेत. सुरवातीला सांगितल्याप्रमाणे जागरण आणि गोंधळ यात बर्‍यापैकी साम्य आहे. ते आपल्याला याच्या मांडणीतून लक्षात येत. अंगणाच्या मध्यभागी पाट मांडला जातो. त्यावर स्वच्छ वस्त्र टाकले जाते. वस्त्रावर अष्टदल काढून किंवा धान्याची रास ठेऊन त्यावर कलश आणि नारळ ठेवला जातो. कलशाजवळ विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन खंडोबाचा टाक किंवा मूर्ती ठेवली जाते. पाटाभोवती उसाच्या पाच ताटांचा मखर करुन त्यावर फुलमाळ अडकवली जाते आणि भंडारा लावून जागरणाला सुरुवात होते. पूजा मांडलेल्या जागेला चौक म्हणतात. या चौकासमोर वाघ्या-मुरळी नृत्य करत देवाला जागरणाला येण्याचं आवतन देतात. वाघ्याच्या हातामध्ये डीमडी व मुरळीच्या हातामध्ये घाटी (घंटी) असते. सोबतीला असलेल्या लोकांच्या हातात तुणतुणे असते.

जागरणामध्ये पाच पावली, तळी भरणे, कोटम भरणे, घटस्थापना, लंगरतोड, ओझ उतरवणे असे धार्मिक विधी केले जातात. तळी भरताना खंडोबाचा जयघोष केला जातो. ‘कैलास राणा शिवचंद्र मौळी’ या शंकर स्तुतीने जागरणाला प्रारंभ केला जातो. देवतांना आवाहन करत गण गौळण म्हटली जाते. खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांचे वर्णन करणारे मल्हारी कथन केले जाते. या सर्व पात्रांचे नाट्यरूपी कथा सादरीकरण वाघ्या-मुरळी करतात. जागरणाचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग होतात. यामध्ये खंडोबाने दैत्यांचा केलेला संहार, खंडोबा म्हाळसेचे लग्न, खंडोबा बाणाईचे लग्न, खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांचा प्रणयप्रसंग व विरहाचे वर्णन केले जाते. याचसोबत नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती, सत्यवान-सावित्री आदींच्या कथा देखील नाट्यरूपात सादर करतात. देवाचे दैवी रुप आणि मानवी रुप सादर करुन खंडोबाच्या जीवनाचे दर्शन घडते. गायन, नृत्य, वादन, सादरीकरण यात वाघ्या-मुरळी आणि यजमान तल्लीन होऊन जातात. वाघ्या-मुरळी हे खंडोबाचे दूत असतात. खंडोबाच्या या उपासकांचा उल्लेख संत साहित्यात आढळतो.

- Advertisement -

जेजुरीच्या खंडेराया जागराला या….या…
पालीच्या तुम्ही गणराया जागराला या….या…

अशा रितीने आवाहन झाल्यानंतर गण म्हंटला जातो त्यानंतर भाविक भक्तांनी मांडलेल्या जागरण विधीमध्ये वाघ्या मुरुळी भक्तांच्यावतीने मल्हारी मार्तंडाला विनवणी करतात. मल्हार कथा पूर्ण झाल्यावर पहाटे आरती करुन जागरण पूर्ण केले जाते.

- Advertisement -

संपूर्ण जागरणात वाघ्या-मुरळी ही पात्र चकासमोर कथा अन नाट्य अभिनय सादर करत असतात. खंडोबाचे उपासक असलेले वाघ्या-मुरळी जागरण करुन खंडोबाचे जीवनचरित्र उलगडून सांगतात. पूर्वी ज्यांना मूल होत नसे असे दाम्पत्य देवाला नवस करुन पहिलं अपत्य देवाला अर्पण करत असत. त्यातील मुलगे हे ‘वाघ्या’ म्हणून तर मुली या ’मुरळी’ म्हणून समाजात वावरत असत. भिक्षुकी करुन पोट भरणे आणि लोकांच्या शुभकार्यात जागरण करणे हाच यांच्या जीवनाचा प्रवास असे. कालांतराने मूल खंडोबाला अर्पण करण्याच्या प्रथेवर कायद्याने बंदी आली. मात्र, खंडोबाचे उपासक आज देखील वाघ्या-मुरळी बनून जागरण करतात. मुरळी पिवळी साडी नेसून कपाळावर भंडारा, गळ्यात कवड्यांची माळ, अंबाडा, अन पदराला बांधलेली घंटी वाजवत नाचते आणि धोतर, सदरा, जॅकेट, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी, तिच्यात भंडारा, हातात दिमडीकाठी घेऊन भंडारा उधळत हब…हब… हब म्हणत वाघ्या तिला साथ करतो.

गोंधळ

गोंधळी लोक देवीचा गोंधळ हे पारंपरिक नाट्य सादर करतात. ज्या प्रकारे वाघ्या-मुरळी यांनी आपलं लोककलेतलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं त्याच पद्धतीने गोंधळ्यांनीदेखील ते केलेलं आहे. गोंधळी हे देवीचे उपासक आहेत. देवीच्या भक्तांची भटकी जात म्हणूनदेखील गोंधळी ओळखले जातात. ज्यांचा कुलाचार कुळधर्म हा देवीचा आहे असे भक्त गोंधळ्यांना बोलावून शुभकार्य प्रसंगी गोंधळ घालतात. गोंधळींच्या रेणुराई व कदमराई या दोन मुख्य पोटजाती आहेत. रेणुराई हे माहुरच्या रेणुकेचे भक्त तर कदमराई हे तुळजापूरच्या भवानीचे भक्त आहेत. घरातील लग्नकार्य प्रसंगी गोंधळ प्रामुख्याने केला जातो. जागरण प्रमाणेच उसाचा मखर करुन त्यात देवीचा घट ठेवला जातो. गणेशस्तुतीने गोंधळाला सुरुवात होते. यात एक मुख्य गोंधळी असतो तर बाकीचे गोंधळी त्याला साथ करतात. यात स्त्रीयांचा सहभाग नसतो.

यावेळी संबळ आणि तुणतुणे ही वाद्य वाजवली जातात. गोंधळात मुख्यत्वेकरुन काकड्या गोंधळ आणि संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार पडतात. काकड्या गोंधळ करण्यास सर्वांना मुभा आहे. तर, संबळ्या गोंधळ हा फक्त गोंधळी जातीचे लोकच सादर करतात. रेणुराई गोंधळी समोर दिवटी ठवून तर कदमराई हातात जळता पोट घेऊन संबळ वाजवत देवीची गाणी म्हणतात. गोंधळी गोंधळ सादर करताना आपल्या सांकेतिक करपल्लवी भाषेने लोकांना चकित करतात. गोंधळात देवीची स्तुती करणारे गाणे, कृष्णकथा, पोवाडे ग्रामीण भागाचा आविष्कार दाखवणारे गीत होतात. यात देखील पूर्वरंग आणि उत्तररंग असतात. उत्तररंगात जांभूळ आख्यान, अंबरीश राजा, विक्रम राजा, विनोदी कलाविष्कार, बतावणी, संवाद सादर करुन गोंधळी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतात.

गोंधळीचा पोषाख हा अंगात झब्बा, किंवा अंगरखा, कपाळावर हळद कुंकवाचा मळवट, गळ्यात कवड्यांची माळ असा असतो.

अंबे जोगवा दे जोगवा दे
माय माझ्या भवानी जोगवा दे ।

अशापद्धतीची देवीची गीत सादर करुन देवीचा उद्धार केला जातो. त्याच्याच जोडीला अनेक विनोदी गीत देखील सादर केली जातात. सबळाच्या तालावर दिवटी पेटवून एका मागून एक गीत सादर करत पहाटेपर्यंत गोंधळ घातला जातो. अशी ही जागरण-गोंधळाची लोककला महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे. तीच स्वरुप जरी आता बदललं असेल तरी देखील ती सादर करण्यामागची भावना ही मूळ आहे. यातून महाराष्ट्राच्या परंपरेच आणि संस्कृतीच दर्शन घडत जात. ही लोककला आणि लोककलावंत टिकले पाहिजेत. आणि पिढ्यानपिढ्या ही संस्कृती समृध्द होत राहिली पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -