सरकारचं काऊंटडाऊन सुरू, शिवजयंती पूर्वीच..; अमोल मिटकरींचं भाकीत

Amol Mitkari

शिवसेना पक्षात शिंदे आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा?, यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या 30 जानेवारीला लागणार आहे. दरम्यान, सरकारचं कऊंटडाऊन सुरू झालं असून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

अमोल मिटकरींनी ट्वीट करत राज्यात राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिले आहेत. सरकारचं कऊंटडाऊन सुरू. शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की, असं सूचक ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात राज्यात मोठी उलथापालथ होणार की काय?, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

सहा महिन्यांपूर्वी अमोल मिटकरी यांनी बारामती दौऱ्यावर असताना शिंदे गटावर टीका केली होती. दोन मंत्र्यांचं असणारं हे सरकार लवकरच बरखास्त झालेलं दिसेल आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी दिसेल, असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला होता. तसेच भविष्यात अजित पवार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य मिटकरींनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे आमदार जर न्यायालयात अपात्र ठरले. तर, महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, अशी शक्यता विरोधी पक्षांकडून वर्तवली जात आहे. अशातच विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सरकार कोसळण्याचे दावेही केले जात आहेत. त्यामुळे आता सुनावणीत नेमकं काय होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा: भाजपमध्येच मुंडेंना बदनाम करणारा एक गट, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं