घरफिचर्ससारांशरहस्यमय ‘वाळवी’

रहस्यमय ‘वाळवी’

Subscribe

‘वाळवी’ ही जशी उपद्रवी आहे तशीच ती उपयुक्तदेखील आहे हे आपण वाचलं आहे, ऐकलं आहे, पण हीच साधी गोष्ट एका सस्पेन्स मर्डर मिस्टरीमधून उलगडून सांगताना दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी प्रेक्षकाला आतपर्यंत पोखरून काढलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत आता नवीन काय पाहायला मिळणार? याचं उत्तर म्हणजे ‘वाळवी’ चित्रपट. ‘दिसतं तसं नसतं, अशी टॅगलाईन घेऊन आलेला परेश मोकाशीचा ‘वाळवी’ हा सिनेमा ही ‘टॅगलाईन’ अक्षरश: जगला आहे.

— आशिष निनगुरकर

परेशचा सिनेमा म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, अशी अटकळ आपण बांधतोच आणि इथे दिग्दर्शकही तुम्हाला निराश करीत नाही. त्याच्या यापूर्वीच्या आकृतिबंधापेक्षा तो यावेळी वेगळा आकृतिबंध निवडतो. त्यासाठीचं पक्कं आणि गोळीबंद ‘पेपरवर्क’ करतो आणि कागदावर सशक्त असलेला आशय-विषय तेवढ्याच ताकदीने पडद्यावर आणतो. भास-आभासाचे खेळ रंगवून पडद्यावर ‘दिसणारी’ आणि प्रत्यक्षात ‘असणारी’ गोष्ट यांची बेमालूम सरमिसळ त्याने केली आहे. मुळात मराठी चित्रपटात ‘डार्क ह्युमर’ या पठडीतले प्रयोग फार कमी झाले आहेत किंवा झालेच नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हिंदीत अगदी ‘जाने भी दो यारों’पासून नुकत्याच आलेल्या ‘अंधाधूंन’, ‘डार्लिंग्स’पर्यंत चित्रपटांची ही भलीमोठी यादी मिळेल. मराठीत परेश मोकाशी यांनी नुकताच सादर केलेला हा ‘वाळवी’ मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल आणू शकतो. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’सारखे चित्रपट देणार्‍या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि मधूगंधा कुलकर्णी यांनी त्यांच्या पोतडीतून काढलेला हा ‘वाळवी’ अगदी त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच सुटसुटीत आहे आणि त्यामुळेच तो सुसह्य वाटतो.

- Advertisement -

मुळात या चित्रपटाची कथा अगदी साधी आहे, किंबहुना हा चित्रपट केवळ एका घटनाक्रमावर बेतलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती घटना नेमकी काय आहे, या घटनेमुळे गोष्टीतील ४ पात्रांच्या आयुष्यात नेमके कसे एकापाठोपाठ एक ट्विस्ट येतात आणि त्यातून ते सहीसलामत बाहेर येतात की नाही याचं उत्तर आपल्याला या चित्रपटात मिळतं. चित्रपटातील ही चारही पात्रं आपल्यासारखीच गोंधळलेली आणि नैतिकदृष्ठ्या भ्रष्ट आहेत आणि म्हणूनच अगदी गंभीर प्रसंगातसुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्याला हसू येतं. हीच खरी कमाल आहे डार्क ह्युमरची आणि ते साध्य करण्यात परेश मोकाशी हे पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. चित्रपटाची कथा हीच ‘वाळवी’ची खरी नायक. अवनी (अनिता दाते) आणि अनिकेत (स्वप्नील जोशी) या जोडप्याची ही गोष्ट. या दोघांचं नाता आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. अनिकेतचं देविकाशी (शिवानी सुर्वे) सूत जुळलं आहे.

अवनीला वैतागलेला अनिकेत तिला घटस्फोट मागत आहे, मात्र ती त्यासाठी तयार नाही. कर्जबाजारी झाल्याने जगाला कंटाळून अवनी आणि अनिकेत दोघेही एकत्रच आत्महत्या करण्याचा बेत आखतात. एकत्रित ‘आत्महत्ये’साठीचं सगळं प्लॅनिंग होतं, बंदुका ‘लोड’ होतात, ‘सुसाईड नोट’ही तयार होतात आणि सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे (अर्थातच अनिकेत-देविकाने ठरविल्याप्रमाणे) घडणार अशी शक्यता दिसत असतानाच यात एक ‘ट्विस्ट’ येतो आणि एकापाठोपाठ एक चित्रविचित्र गोष्टी घडू लागतात. या गोष्टी काय आहेत? अवनी-अनिकेत-देविका या तिघांचं पुढे काय होतं? या सगळ्या गोष्टीत अंशुमन (सुबोध भावे) याची नक्की भूमिका काय आहे? या गोष्टीचा लाकूड पोखरणार्‍या छोट्याशा ‘वाळवी’ या किड्याशी काय संबंध आहे, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी ‘वाळवी’ पाहायला हवा. धक्कातंत्र हा ‘वाळवी’चा आत्मा आहे. सुरुवातीपासून ते मध्यंतरापर्यंत आणि त्यानंतरही ‘क्लायमॅक्स’पर्यंत दिग्दर्शक एकापाठोपाठ धक्के देऊन एका थरारक चित्रपटाचा अनुभव देतो.

- Advertisement -

अत्युच्च पातळीवर गेलेला ‘क्लायमॅक्स’ ही ‘वाळवी’ची जमेची बाजू आहे. काही सिनेमे त्याच्या ‘क्लायमॅक्स’साठी ओळखले जातात. ‘वाळवी’ ही त्यापैकीच एक ठरेल. चित्रपटाची एकूणच कथा, त्यातील व्यक्तिरेखांची गुंतागुंत, एकमेकांकडे संशयाने अन् कधी सुडाने पाहणारे हिरो, अँटिहिरो, कथेतील वेगवेगळी वळणे, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा असा सारा पट दिग्दर्शक परेश मोकाशी मोठ्या शिताफीने उभा करतो. हे सारं काही एका सूत्रात बांधताना सिनेमाची पकड ढिली होण्याची किंबहुना तो भलत्याच वाटेवर भरकटण्याची आणि कंटाळवाणा होण्याची शक्यता होती, मात्र इथे ते होत नाही. मुख्य कलाकारही अगदी सहज आणि नैसर्गिक अभिनय करतात. अनिता दाते, स्वप्नील जोशी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. सुबोध भावे-शिवानी सुर्वे यांच्यातील खडाखडी छान रंगली आहे. चित्रपटाचा आशय अतिशय गंभीर आणि ‘टेन्स’ असला तरीही वेळोवेळी खटकेबाज संवादाने चित्रपटात ‘डार्क ह्युमर’ डोकावत राहते. आशयातील ‘ग्रे’ शेड मंगेश धाकडेचं पार्श्वसंगीत अचूक टिपण्याचं काम करतं.

एक नवरा आपल्या विवाहबाह्य संबंधाखातर आपल्या मानसिक संतुलन ढळलेल्या बायकोला मारायचा कट रचतो आणि त्यात अनाहूतपणे तो, त्याची प्रेयसी आणि एक मानसोपचारतज्ञ फसतात आणि पुढे जे काही घडतं ते आपण एन्जॉय करत पाहतो आणि त्या घटनेचा शेवट जेव्हा होतो तेव्हा मात्र आपण आ वासून स्क्रीनकडे बघत बसतो. यापलीकडे याविषयी काही बोलणं या चित्रपटासाठी मारक ठरेल असं मला वाटतं. कथेमधल्या नवर्‍याची बायको करत असलेलं वाळवीवरील संशोधन आणि मनुष्याच्या मेंदूला लागलेली वाळवी ही कशी एखाद्याला पोखरून काढते आणि त्याचा अंत नेमका कसा होतो याचा बरोबर संबंध परेश यांनी चित्रपटात जोडला आहे.

चित्रपटातील पात्रांची पार्श्वभूमी मांडण्यात दिग्दर्शकाने वेळ घालवलेला नाही ही पाहिलं तर चांगली गोष्ट आहे आणि पाहिलं तर चुकीची आहे. माझ्या मते अशा चित्रपटात ती गोष्ट नसलेलीच बरी. कारण मग प्रेक्षक प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क शोधायला सुरुवात करतात, जे अशा जॉनरच्या चित्रपटांसाठी योग्य नाही. बाकी संवाद, पार्श्वसंगीत, चित्रीकरण सगळंच उत्तम जमून आलं आहे. काही ठिकाणी बारीक चुका आढळून येतात. मानवी आशयाची गडद बाजू, त्यातील हेवेदावे, एकमेकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करणं ही सारी वैशिष्ठ्ये असलेली ‘फिल्म न्वार’ ही विदेशी संकल्पना आपल्याकडे हिंदीमध्ये भारतीय पद्धतीत ‘मोल्ड’ होऊन वेळोवेळी आली. सन २००० नंतरच्या सिनेमात ती अनेक दिग्दर्शकांनी समर्थपणे साकारली, मात्र मराठीत हा आकृतिबंध इतक्या ताकदीने आला नव्हता.

चित्रपटात गाणी नाहीत, पात्रांचा परिचय, कथेची प्रस्तावना वगैरे औपचारीकताही नाहीत. चित्रपट सुरू होतो आणि थेट मूळ मुद्याला हात घालतो. सुरुवात चुकवणे किंवा पॉपकॉर्न – लू ब्रेक्ससाठी खुर्ची सोडणे असं काहीही करायला वाव नाही. पुढे काय होईल याचा अंदाज आपण लावू शकत नाही आणि तसा प्रयत्न करण्याइतकाही वेळ नाही. चित्रपट सुसाट धावतो आणि धक्क्यांमागून धक्के देत राहतो. चित्रपटाचा खरा हिरो परेश मोकाशी आहे. त्याचं दिग्दर्शन आणि धक्कातंत्र या साध्या थ्रिलर कथानकाला ‘कल्ट’ चित्रपटांच्या रांगेत नेवून बसवतं आणि चित्रपटाची नायिका आहे ‘वाळवी.’ हिंदीतल्या श्रीराम राघवन यांच्या सिनेमांच्या शैलीतला, पण स्वतंत्र परेश मोकाशी टच असलेला हा सिनेमा आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते हे सर्वपरिचित चेहरे या सिनेमात आहेत, पण ते त्यांच्या परिचित इमेजपेक्षा वेगळ्याच व्यक्तिरेखांमध्ये असल्याने गंमत येते. स्वप्नील जोशी यांनी परिस्थिती हाताबाहेर जातानाची हतबलता उत्तम प्रकारे दाखवली आहे. अनिता दाते यांनी बायकोचे नैराश्य उत्तम साकारले आहे. सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांच्यातील खाष्ट जुगलबंदी झकास रंगली आहे.

नम्रता संभेराव छोट्याशा भूमिकेतही लक्षात राहते आणि वाळवी, तिने तर अफाट काम केलं आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखांची गुंतागुंत, त्यांच्यातला संशयकल्लोळ, कथेत येणारी वेगवेगळी वळणे, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा असा सगळा पट लेखकद्वय (परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी) आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी मोठ्या शिताफीने उभा केला आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व. चि.सौ.कां.’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केलेले परेश मोकाशी याही वेळी निराश करत नाहीत. संकलक अभिजित देशपांडे, सौरभ प्रभुदेसाई यांनी सिनेमाची गती अचूक पकडली आहे.

फार संथही नाही की भरदार वेगानं डोक्यावरूनही जात नाही. मधुगंधा, परेश यांच्या खटकेबाज संवादांतून चित्रपटात ‘डार्क ह्युमर’ डोकावत राहतो. थ्रिलरपटांमध्ये व्यक्तिरेखा, दिग्दर्शन, कथा-पटकथा यांच्या बरोबरीने पार्श्वसंगीत महत्त्वाचं असतं. मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत कथेला अनुरूप माहोल अफलातून पद्धतीने तयार करतं. ‘वाळवी’ हा नुसता थ्रिलरपट नाही. त्यात अनेक छटा आहेत. कीड लागलेल्या समाजावर, नात्यांवर भाष्य आहे. ते कथानकाच्या ओघात आपसूक येतं आणि शेवटाला ते एखाद्या रूपककथेच्या पातळीवर नेतं. ‘वेड’ सिनेमाने मराठी प्रेक्षकांना मोठ्या संख्येने पुन्हा सिनेमागृहात आणलेलं असतानाच त्यांना तिथेच थांबवून, खिळवून ठेवण्याची क्षमता ‘वाळवी’ या चित्रपटात आहे.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -