काहीही गैर केलेले नाही, निवडणुकीच्या आधीपासूनच युती, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट

आम्ही काहीही गैर केलेले नाही. शिवसेना आणि भाजपाची निवडणुकीच्या आधीपासूनच युती होती आणि आम्ही आता त्यांच्यासोबतच आहोत.

eknath shinde

मुंबई : आम्ही काहीही गैर केलेले नाही. शिवसेना आणि भाजपाची निवडणुकीच्या आधीपासूनच युती होती आणि आम्ही आता त्यांच्यासोबतच आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकार स्थापनेमागची भूमिका मांडली. महाविकास आघाडी सत्तेत असताना शिवसेनेच्या आमदारांना काम करणे कठीण झाले होते. आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विस्ताराचा प्रयत्न करत होते, असे शिंदे म्हणाले.

या सर्व घडामोडी घडत असताना, भाजपा सत्तेकरिता काहीही करू शकतो, असे सर्वांना वाटत होते. पण या 50 जणांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आणि त्यांचा विकासाचा अजेंडा आहे, म्हणून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, हे भाजपाने दाखवून दिले. त्यांच्याकडे आमदारांचे संख्याबळ जास्त असतानाही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. एवढेत नव्हे तर, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देखील त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. केवळ सत्तेसाठी नव्हे तर, आमची विचारधारा जुळत असल्यानेच पाठिंबा दिल्याचे भाजपाने दाखवून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागेल, हे त्यांना अपेक्षित नव्हते. पण त्यांनी पक्षनेतृत्वाच्या आदेशाचे पालन केल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींची प्रशंसा
विकासाची कामे हाती घेऊन राज्य प्रगतीपथावर न्या. विकासकामांसाठी माझा आणि माझ्या सरकारचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. केंद्र सरकार आमच्याबरोबर असणे ही खूप मोठी गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवले, याबद्दल पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मी आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.

युतीच्या 200 जागांचे लक्ष्य
विधानसभेत बहुमत चाचणी जिंकल्यानंतर, पुढील विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू, असा दावा शिंदे यांनी केला होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आमच्याकडे सध्या 170 आमदारांचे संख्याबळ आहे. केवळ 30 आमदारांची आवश्यकता आहे. आम्ही तर 200हून अधिक जागा जिंकू, असे ते म्हणाले.

हेही वाचा – सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! घरगुती सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, नवे दर जाहीर