ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून प्रचलित असलेले एकनाथ शिंदे होते रिक्षा चालक, जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास

एकनाथ शिंदे यांनी करियरच्या सुरुवातीला रिक्षा चालवली होती. त्यांचा राजकीय जीवन प्रवास थक्क करणारा आहे.

eknath shinde to arrive in mumbai on special flight to meet governor shocks thackeray govt

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे हळूहळू स्पष्ट होऊ लागली. विधान परिषद निवणुकीचा काल धुरळा उडाला. यामध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे. या निवडणूकीचा निकाल कालच लागल्याने आता पुढचे काही दिवस शांत जातील असं वाटतं असतानाच आज सकाळपासून राज्यात राजकीय भूकंप झाला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून ते सुरत येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्या या भेदक कृतीमुळे शिवसेनेत आणि पर्यायाने महाविकास आघाडीमध्ये काय होणार हे पाहावं लागेल.(Eknath Shinde Life journey)

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून शिवसेना नाव हटवलं, पुढची भूमिका काय?

दरम्यान, कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी अशी बंडखोरी का केली? त्यांचा यामागचा उद्देश काय असेल? याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. करियरच्या सुरुवातीपासून एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले. किंबहुना ठाण्यातील शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे म्हणजेच ठाण्यातील शिवसेना असं समीकरण तयार झालं असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. सुरुवातीपासूनच शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळख मिळवलेल्या एकनाथ शिंदेंचा जीवन प्रवास जाणून घेउया.

सातारा जन्मस्थान

एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ सालचा. सातारा हे त्यांचं जन्मस्थान. मात्र बालवयातच त्यांनी गाव सोडलं आणि ठाण्यात स्थायिक झाले. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या एकनाथ यांनी ठाण्यातील मंगल हाईस्कूल शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर न्यू इंग्लिश हाई स्कूलमधून अकरावी केली. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

सुरुवातीला चालवली रिक्षा 

दरम्यान, सुरुवातीला त्यांनी वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले. मात्र नोकरीत ते फार वेळ रमले नाहीत. म्हणून त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला.

आनंद दिघेंनी दिला पाठिंबा

ऑटो रिक्षा चालवत असतानाच त्यांना राजकीय दृष्टी मिळाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे या दोन व्यक्तींनी त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या काळात त्यांना आनंद दिघे यांचा चांगला सहवास लाभला. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या मनात विश्वास निर्माण केला. आपल्या कामामुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे एकनाथ शिंदे सर्वपरिचित झाले. म्हणूनच एकनाथ शिंदे यांना वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी म्हणजेच १९८४ साली त्यांना किसन नगर येथील शाखाध्यक्ष पद दिले. आजही किसन नगरमध्ये एकनाथ शिंदे यांचे खूप समर्थक आहेत. एकनाथ शिंदेही या विभागातील अनेक लोकांना वैयक्तिक ओळखत असल्याने त्यांचा इथे आजही चांगलाच दबदबा आहे.

…असे ते झाले ते नगरसेवक

शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित सांभाळल्याने आनंद दिघे यांनी त्यांना थेट नगरसेवकाचं तिकीट दिलं. १९९७ साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००१ साली त्यांना ठाणे महापालिकेचं सभागृह नेतेपद मिळाले. ते जवळपास २००४ पर्यंत नगरसेवक पदी होते. त्यांचं कार्य आणि पक्षनिष्ठा पाहून त्यांना आमदारकीचंही तिकीट मिळालं. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. मात्र एकनाथ शिंदे जिंकून आले होते. तर २००५ साली ते ठाणे जिल्हा प्रमुख झाले. २००४ पासून ते आजतागायत शिंदे ठाण्याचे आमदार राहिले आहेत.

मधल्या काळात शिवसेनेवर अनेक संकटे आली. २५ वर्षांची भाजप – शिवसेना युती तुटली. स्वबळावर निवडणुका झाल्या. या सर्व अडचणींच्या काळात एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे होते.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेची फसवणूक झाली असा दावा करण्यात येतो. या काळातही इतर पक्षांना हाताशी घेऊन सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी, मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे चर्चेत होती. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या काळात एकनाथ शिंदे या निर्णयावरून नाराज असल्याच्या चर्चाही उठल्या होत्या. मात्र या चर्चा पेल्यातील वादळप्रमाणे शमल्या. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले नाही यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये आजही नाराजी आहे. हीच नाराजी आजच्या बंडखोरीतून बाहेर आली असल्याचंही म्हटलं जातंय.

एकनाथ शिंदे यांच्यावर कोसळला होता दुःखाचा डोंगर

एकनाथ शिंदे आणि लता शिंदे या जोडप्याला तीन मुले होती. दिपेश, शुभदा आणि श्रीकांत. एका अपघातात दिपेश आणि शुभदा यांचा मृत्यू झाला. आपल्या चिमुकल्या मुलांना मुखाग्नी देण्याची वेळी एकनाथ शिंदे यांच्यावर आली. २००० साली हा भयंकर अपघात घडला होता. या अपघातानंतर एकनाथ शिंदे बरेच खचले होते. मात्र आनंद दिघे यांनीच त्यांना या दुःख प्रसंगातून बाहेर काढले. त्यांचा लहान मुलगा श्रीकांत शिंदे हे आज लोकसभेत खासदार आहेत.