घरराजकारणपॅचअपसाठी परब, नार्वेकर आणि सरदेसाईंच्या माध्यमातून ठाकरेंचा फडणवीसांशी संपर्क, फडणवीसांचे मात्र तोंडावर...

पॅचअपसाठी परब, नार्वेकर आणि सरदेसाईंच्या माध्यमातून ठाकरेंचा फडणवीसांशी संपर्क, फडणवीसांचे मात्र तोंडावर बोट…

Subscribe

संजय सावंत

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत ‘उठावा’ला भाजपाची फूस असल्याचा एकीकडे दावा केला जात असतानाच दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र भाजपाच्या मध्यस्थीने पॅचअपचे आटोकाट प्रयत्न करत होते, असे आता सांगितले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना २१ ते २४ जून दरम्यान एकदा नव्हे तर तीनदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण देवेंद्र फडणवीसांनी त्याला प्रतिसाद दिलेला नव्हता; तसेच जे काही बोलायचे ते दिल्लीतील नेतृत्वाशी बोला असा निरोप दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

- Advertisement -

राज्यामध्ये २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक झाली. एकीकडे त्याचा निकाल भाजपासाठी अपेक्षित असला तरी, महाविकास आघाडीसाठी धक्कादायक लागत होता. पण त्याचवेळी तत्कालीन शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे १५ आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. तीच शिवसेनेतील दुहीची नांदी होती. नंतर एकनाथ शिंदे हे या सर्व आमदारांसह आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीमध्ये एका हॉटेलमध्ये राहिले होते. विशेष म्हणजे, या दरम्यान महाराष्ट्रातून एक-एक आमदार शिंदे गटात सामील होत गेला आणि ही आमदारांची संख्या चार दिवसांत ५०वर गेली. त्यात शिवसेनेच्या ५५पैकी ४० आमदारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्यासह ८ मंत्री त्यात होते. तसेच छोटे पक्ष आणि अपक्ष असे मिळून आणखी १० आमदारांनी देखील शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

तर दुसरीकडे, या फुटीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रचंड अस्वस्थ आणि गोंधळलेले झाले होते. एकनाथ शिंदे गटाऐवजी आपल्यासोबत भाजपाने सरकार स्थापन करावे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. विधान परिषदेच्या निकालाच्या दिवसापासून अगदी सत्तेतून पायउतार होईपर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण भाजपाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, असे विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisement -

तसेच एकनाथ शिंदे यांना बाजूला करून आपण दोघे बोलू, असेही उद्धव यांनी फडणवीस यांना सांगितले होते. पण आता उशीर झाला आहे. मी शिंदेसोबत विश्वासघात करू शकत नाही. जे बोलायचे ते आमचे नेते अमित शहा यांच्याशी बोला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. ही माहिती फडणवीस यांच्या गोटातील जवळच्या नेत्याने सांगत उद्धव यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याच्या वृत्ताला त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दुजोरा दिला.

‘आपलं महानगर’ला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी अत्यंत विश्वासू समजले जाणारे विभागप्रमुख, तत्कालीन परिवहनमंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांच्या माध्यमातून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि एकत्र सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला. पण फडणवीस यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला, अशी माहितीही सूत्रांनी दिली. नंतर त्यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, मिलिंद नार्वेकर हे एकीकडे सुरतमध्ये एकनाथ शिंदे गटाशी चर्चा करण्यासाठी गेले होते, तर दुसरीकडे फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करत होते. पण त्याही वेळेस फडणवीस आपल्या मताशी ठाम राहिल्याचे समजते.

‘मातोश्री’च्या निकटवर्तीयाने उद्धव ठाकरे यांचे भाचे व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत भेटण्याचा निरोप फडणवीस यांना दिला होता. पण त्याही वेळी फडणवीसांनी दाद दिली नाही. अशा प्रकारे २१ ते २४ जून दरम्यान अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्रीपदाबरोबरच शिवसेना पक्ष फुटीपासून वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण फडणवीस यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्राकडूनही ‘नो-रिस्पॉन्स’
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नकारच मिळू लागल्यावर उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे प्रयत्न सुरू केले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरेंच्या पदरी निराशाच आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी खासदारांच्या माध्यमातूनही प्रयत्न केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा, भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी आपल्याला काहीही प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना सांगितल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर हाच अनुभव भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना उद्धव ठाकरेंकडून आला होता. मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरे यांनी ताठर भूमिका घेतल्यानंतर तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता. तर दोनदा त्यांनी शहा यांचा फोनही घेतला नव्हता, असे आता सांगण्यात येते. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी अमित शहा यांच्याकडून झाली.

रश्मी ठाकरेंकडूनही प्रयत्न?
एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ केल्यामुळे शिवसेनेला लागोपाठ हादरे बसू लागले. अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पुढे सरसावल्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांना तडजोडीसाठी निरोप पाठवताना निवडक बंडखोर आमदार यांच्या पत्नीशी त्या बोलल्या. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. सेनेच्या बंडखोर आमदारांचे नियंत्रण भाजपाच्या हाती होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी एका व्हिडीओमध्ये आपल्या मागे एक मोठी शक्ती आणि महासत्ता असल्याचा उल्लेख केलेला होता.

शिवसेनेकडून इन्कार
शिवसेनेने अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याच्या वृत्तचा इन्कार केला आहे. असे काहीच झाले नसल्याचा खुलासा शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी केला आहे. मात्र ‘आपलं महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार परब, नार्वेकर आणि सरदेसाई यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी पॅचअपसाठी तीनदा प्रयत्न केले. मात्र ते फोल ठरल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बंडाच्या चौथ्या दिवशी वर्षा बंगला सोडला आणि मातॊश्रीवर राहायला गेले. शेवटी २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -