घरताज्या घडामोडीसर्वगुणसंपन्न शिंदेंसारख्या नेत्याला एकच खातं का दिलं? अजित पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

सर्वगुणसंपन्न शिंदेंसारख्या नेत्याला एकच खातं का दिलं? अजित पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

Subscribe

एकनाथ शिंदे जर एवढे सर्वगुणसंपन्न होते तर त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ हे एकच खातं का दिलं? असा प्रश्न विचारून पवारांनी शिंदेंच्या कार्यकौशल्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस अजित पवारांनी चांगलाच गाजवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केल्यानंतर यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रतिप्रश्न केला. एकनाथ शिंदे जर एवढे सर्वगुणसंपन्न होते तर त्यांनी शिंदे यांना फक्त रस्ते विकास महामंडळ हे एकच खातं का दिलं? असा प्रश्न विचारून पवारांनी शिंदेंच्या कार्यकौशल्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. (Why was only one ministry given to an all-round leader? Ajit Pawar’s counter-question to Fadnavis)

हेही वाचा पुन्हा येईन, म्हणालो होतो, पण एकटा आलो नाही; टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांनी झापलं

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचं भरपूर समर्थन केलं. त्यांचं कौतुक केलं. मग त्यांच्या युतीच्या कार्यकाळात शिंदेंकडे फक्त रस्ते विकास महामंडळ हे एकच खातं का दिलं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, शिंदे एवढे कतृत्त्वान होते तर जनतेशी संबंधित खाती त्यांना का दिली नाहीत? रस्ते विकास महामंडळ विभागाचा जनतेशी काहीच संबंध येत नाही. मग जनतेशी संबंधित नसलेलं खातं एकनाथ शिंदेंना का दिलं? जो नेता एवढा कर्तृत्वान असतो त्याला अनेक महत्त्वाची खाती दिली जातात. मग एकनाथ शिंदेंना एकच खातं का दिलं होतं, असा सवाल उपस्थित करत पवारांनी फडणवीसांच्या कोडकौतुकावर प्रश्नचिन्ह उभं केलं.

देवेंद्रजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते झाले

- Advertisement -

विधानसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीसांचं भाषण आम्ही नेहमीच ऐकतो. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा उत्साह दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच, अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री झाले. अडीच वर्षांत असा प्रवास करणारे ते एकमेव नेता असल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत, हे सतत का सांगावं लागतं? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत असं सतत सांगावं लागत असेल तर आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा शिंदे सरकारने १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधात महाविकास आघाडीची ९९ मते

राज्यपालांवरही निशाणा

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना बहुमताचा ठराव घाईघाईत आणणे गरजेचे नव्हते. राज्यपालांनी आतापर्यंत अनेक गोष्टी लांबणीवर टाकल्या. अनेकदा अनेक समस्या घेऊन मी आणि एकनाथ शिंदे राज्यपालांकडे गेलो. राज्यपाल आम्हाला थांबवून बऱ्याच गोष्टींवर चर्चा करायचे. पण तरीही अनेक कामं रेंगाळली. मात्र, आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आमच्या काळात १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी त्यांनी वेळ दिला नाही. विधानसभा अध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतरही आम्ही राज्यपालांकडे वेळ मागितली. विविध अधिवेशनात याबाबत मागणी केली. कॅबिनेटमध्ये ठरावही करायचो. पण अध्यक्षपदाची तारीख तेव्हा लागली नाही. मात्र, नवं सरकार सत्तेत आल्यानंतर तत्काळ अध्यक्षपदाची निवडणूक लागली.

दोन तास गप्पा मारून गेले तरीही…

अजित पवार आपल्या अधिवेशनाच्या भाषणात नेहमीच हटके शैली वापरतात. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ते आपले मत मांडत असतात. यावेळीही त्यांनी अनेक नेत्यावंर मिश्किल टिप्पणी केली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनाही टोला लगावला. सूरतला जाण्याआधी अब्दुल सत्तार माझ्याशी आणि जयंत पाटलांशी दोन तास बोलले. आमच्यात चांगल्या गप्पा झाल्या. पण त्याहीवेळी त्यांनी बंडखोरीबाबत काहीही सांगितलं नाही. आमच्याशी दोन तास गप्पा झाल्यानंतर ते थेट सूरतलाच गेले, असं अजित पवार म्हणाले.

…यात काहीतरी काळंबेरं

१०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही. पण ५० आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते. यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा

 

मोठी डोकी कधी एकत्र येतील कळणारही नाही

मिरच्या झोंबल्या पाहिजेत असे काहीतरी टाक असे संदीपान भुमरे बोलत असल्याची एक क्लीप बाहेर आली. भुमरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजेत अशी विचारणा करतानाच मग शहाजीबापूची काय झाडी… आलं… काय हे बापू… अशी टिपण्णी करताना ही मोठी डोकी कधी एकत्र येतील कळणारही नाही तुम्ही साधे आमदार आहात हे लक्षात घ्या असेही अजित पवार यांनी त्यांना सुचवले.

राज्यातील जनता पाहत होती

तिकडे गोव्यात काही आमदार मुख्यमंत्री शिंदे होणार जाहीर झाल्यावर नाचले… काही तर टेबलावर उभे राहून नाचले… आमदार हे योग्य नाही. बंडखोर आमदार कुठुन कुठे गेले हे राज्यातील जनता पाहत होती. अब्दुल सत्तार तर चांगलं बोलले बिर्याणी खायला जातो. पण अजून बिर्याणीबाबत एक चकार शब्द त्यांनी काढला नाही.

शिंदे तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून काम करा. मात्र एक लक्षात घ्या शिवसैनिक हा कधीच नेत्यांसोबत जात नाही तो शिवसेनेसोबतच रहातो हा इतिहास आहे आणि हे चित्र पाहायला मिळेल असा इशाराही अजित पवार यांनी काही उदाहरणे देत दिला.

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येत होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. मात्र उध्दव ठाकरे यांना आग्रह झाल्यावर तुमच्या सगळ्यांच्या जीवावर त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. एकंदरीतच ज्यांच्यासोबत गेलात त्या भाजपने १९८० पासून सेनेच्या मदतीने पक्ष वाढवला आहे. भाजप सेनेसोबत राहून ताकद वाढवत गेला आहे. शिंदे तुम्ही आता आपला ग्रुप वाढवण्याचा प्रयत्न करणार आहात तर भाजप आपला पक्ष वाढवणार आहे त्यामुळे हे अंतर्गत भांडण सुरूच राहिल हेही अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने कधी अन्याय केला नाही

तिकडे गेल्यावर ही अनैसर्गिक युती आहे असे बोलत होतात. काहींनी राष्ट्रवादीने अन्याय केला असा पाढा वाचला. मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कधीच भेदभाव केला नाही. आमदारांचा निधी एक कोटीवरुन पाच कोटीवर केला. डोंगरी विकासाचा निधी वाढवला. नगरविकास खात्याला सुरुवातीला ३६१ कोटी दिले त्यानंतर २६४५ कोटी दिले. मी भेदभाव करणारा माणूस नाही. सर्व खात्याला निधी दिला. फडणवीस तुम्हीही मुख्यमंत्री होतात. फायनल हात मुख्यमंत्री फिरवतात याची आठवणही करून देताना राष्ट्रवादीने कधी अन्याय केला नाही. लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने ४०१ शिवभोजन थाळी केंद्र शिवसेनेला दिली. हे काम केले तर मी उपकार केले नाहीत. सांगायचं तात्पर्य की राष्ट्रवादीने अन्याय केला असा आरोप केला जात आहे मात्र राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तो योग्य नाही असे सांगतानाच यावेळी अजित पवार यांनी निधी दिला त्याची यादीच सभागृहात वाचली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -