घरताज्या घडामोडीराज्यातील राजकारणात उलथापालथ, आजच्या 'या' घडामोडी ठरल्या लक्षवेधी

राज्यातील राजकारणात उलथापालथ, आजच्या ‘या’ घडामोडी ठरल्या लक्षवेधी

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात खूप मोठ्या हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राजकारणात हादरे बसायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला २५ आमदार त्यांच्याकडे असल्याचं समोर आलं होतं. आता एक एक आमदार शिंदे गटात सामिल होत असून आता शिंदे गटाची संख्या ४२ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अभूतपूर्व अशा या घटनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओनुसार ते आपल्या आमदारांना संबोधत असून त्यांना देशातील राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे, ज्या पक्षाने पाकिस्तानलाही धूळ चारली आहे, असं ते या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. अर्थात त्यांच्या या वाक्यांमुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. २१ जूनपासून सुरू झालेल्या या बंडाच्या कहाणीवर आता थोडा थोडा प्रकाश पडत आहे. आजच्या दिवसभरात राज्यातील राजकारणात नेमकं काय काय घडलं हे जाणून घेऊयात. (The upheaval in the politics of the state, today’s ‘these’ developments have become noticeable)

१)   शिवसेनेचे माहिम, दादर मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी बुधवारी रात्री मुंबई सोडून गुवाहाटीत जाण्याचा निर्णय घेतला. हे आमदार गुवाहटित दाखल झाले असून आज सायंकाळी रविंद्र फाटकही गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

- Advertisement -

२) दरम्यान, आज सकाळी शिवसेनेचे सहा आमदार नॉट रिचेबल होते. आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि दिलीप लांडे यांच्याशी संपर्क होत नसल्याचं सकाळी स्पष्ट झालं होतं. दरम्यान, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड गुवाहटित दाखल झाले आहेत.

३) बंडखोर आमदारांच्या घरांवर हल्ला होऊ शकतो, असा गुप्तचर विभागाचा अहवाल असल्यामुळे बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -


४) बंडखोर आमदारांचं प्रकरण समोर येताच  शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून बैठकांचा सपाटा लावण्यात येत होता. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. दरम्यान, तेही सकाळी नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ व्हायरल होताच, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली असून तेथे अमित शहा आणि जे.पी नड्डा यांची भेट घेणार असल्याचे कळते आहे. तसेच, या घडामोडींमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

५) महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आणण्याच्या प्रयत्नात दहिसर बोरिवलीमधील एकमेकांचे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमदारांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं. यातील एक आहेत उद्धव ठाकरेंचे उजवे प्रकाश सुर्वे तर दुसरे आहेत फडणवीस यांचे उजवे प्रवीण दरेकर. मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे एकीकडे शिंदेसोबतच्या बंडखोर आमदारांमध्ये सहभागी आहेत. शिवसेनेच्या ४२ बंडखोर आमदारांमध्ये प्रकाश सुर्वे आहेत. त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली मविआ सरकार पडण्यात प्रकाश सुर्वे हातभार लावत आहेत.

आणखी वाचा

६) शिवसेनेतील १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात आहेत असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. तसचे, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासही तयार असल्याचे ते म्हणाले होते. आमदार ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला आणि भाजपच्या आमिषाला बळी पडले आहेत. जे आमदार शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी पुन्हा शिवसेनेशिवाय निवडून येऊन दाखवावे असा थेट इशारा संजय राऊत यांन दिला आहे. काल रस्त्यावर जे उतरले होते तेच खरे शिवसैनिक आहेत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

७) राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया उमटत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची सही तपासून घेणार असल्याचं सांगितलं. कायद्यामध्ये पक्षप्रमुखांनी गटनेता नेमायचा असतो. त्यानंतर गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. परंतु एकनाथ शिंदे हे विधिमंडाळाचे गटनेता प्रमुख होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिल्यानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली होती. तर सुनील प्रभू यांनीच प्रतोद म्हणून पत्रावर सही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

८) ही आहे आमदारांची भावना… म्हणत एकनाथ शिंदेंनी एक पत्र ट्विटरवर दुपारी ट्विट केलं. काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती, अशी खंतही संजय शिरसाट यांनी पत्रातून व्यक्त केलीय.

९) दिवसागणिक बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडाही वाढत आहे. हे बघून महाविकास आघाडी (मविआ) मध्ये सामील असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे. अचानक शिवसेनेला लागलेली ही गळती शिंदे निर्मित आहे की शिवसेनेचा उद्धव ठाकरे निर्मित मास्टर प्लान असा प्रश्न आता या नेत्यांना भेडसावू लागला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार ही आता काळ्या दगडावरील रेघ असून मागील अडीच वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला आता विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी असून यामागचा चाणक्य कोण यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

१०) या सगळ्या गोंधळात शिंदे गटाला मूळ पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याकरता एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. शिवसनेचे धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे कायेशीर लढाई लढवतील असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. महत्त्वाचं म्हणजे, यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याचंही सांगण्यात येतंय.

११) महाविकास आघाडी सरकार पडू नये यासाठी राष्ट्रवादी पूर्णपणे ठाकरेंना मदत करणार असून एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कारणं आणि सेनेच्या अंतर्गत वादाबाबत आम्हाला माहिती नाही असं जयंत पाटील माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. यासह बंडखोरी केलेले आमदार आज ना उद्या परत येतीलच ते परत आल्यावर अधिक चित्र स्पष्ट होईल आणि असा विश्वास आजही आम्हाला वाटतोय. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला तसेच आमदारांना दिलेली भावनिक साद ऐकून त्याला आमदार सकारात्मक प्रतिसाद देतील अशी आम्हाला खात्री आहे असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

१२) जे आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत, त्यांनी महाराष्ट्रात यावं. सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका न मांडता प्रत्यक्ष मुंबईत या आणि उद्धव ठाकरेंना भेटा. तुमची भूमिका मांडा, तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल. मविआमधून बाहेर पडावं, यासाठी आधी मुंबईत या. आपण पक्के शिवसैनिक आहात. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. आधी तुम्ही 24 तासात परत या. उद्धव साहेबांसोबत बसून भूमिका मांडा, असं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आमदारांना ठणकावून सांगितलंय.

१३) एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह ४६ आमदार असल्याचा दावा केला जातोय. मात्र, यातील अनेक आमदारांना फसवून  घेऊन गेल्याचा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून सुटलेले कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती दिली. भाजपने कटकारस्थान करून महाविकास आघाडी सरकारला पाडण्याचा डाव आखल्याचंही नितीन देशमुख यांनी सांगितलं.


१४) दरम्यान, नितीन देशमुख यांनी त्यांच्या ओढावलेल्या घटनेचे कथन केल्यानंतर शिंदे गटातून त्यांचा दावा खोडण्यात आला. “आमदार नितीन देशमुखांचा मी स्वतःची सुटका करून पळून आलो हा दावा खोटा. नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले त्याची छायाचित्रे”, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले.

१५) शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरींनंतर सुरतनंतर आता गुवाहाटीमध्येही मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये महाराराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहे. यामध्ये शिवसेनेचे 35 तर 7 अपक्ष आमदार आहे.

१६) दिवसभर परिस्थिती चिघळत जात असल्याने संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे बंडखोर आमदारांना आर्त हाक दिली. ‘चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!’ असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

१७) आसाममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेना आमदारांना पश्चिम बंगालला पाठव, त्यांचा योग्य पाहुणचार करु असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लगावला आहे. सत्तेचा गैरवापर करुन भाजपने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील उद्भवलेल्या राजकीय स्थितीवर त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.

अधिक वाचा – शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या, त्यांचा योग्य पाहुणचार करू – ममता बॅनर्जी

१८) सगळीकडे अस्थिरतेचं वातावरण सुरू असताना राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान, ‘राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा देणार आहेत. हे सरकार कसं टिकेल यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशीही बोलणं झालं आहे. आदित्य ठाकरेंचाही फोन आला होता. त्यामुळे मीडियाला विनंती आहे की, यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा -उद्धव ठाकरेंना आमचा पूर्णपणे पाठिंबा, सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करणार; अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका

१९) अखेर एकनाथ शिंदे यांचा तो व्हिडिओ सायंकाळी सातच्या दरम्यान व्हायरल झाला आणि चित्र स्पष्ट होत गेलं. एकनाथ यांच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात आहे हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरीही त्यांच्या या व्हिडिओनुसार सर्व रोख भाजपकडे जात आहे. शिंदे यांचा बंडखोर आमदारांशी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असून ते आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही, असं म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात, आमदारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायर

२०) सरतेशेवटी ज्यांच्या प्रतिक्रियेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होते ते शरद पवार अखेर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी फडणवीस- शिंदे यांची खेळी तुर्तास लांबवली. पवारांच्या एन्ट्रीमुळे फडणवीस-शिंदे खेळी कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना (Revolt MLA) सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात यावे लागणार आहे. परिणामी आता पुढील काही दिवस एकनाथ शिंदे गट आणि फडणवीसांच्या सत्तास्थापनेचा खेळ लांबला आहे.

अधिक वाचा – शरद पवारांच्या एन्ट्रीने फडणवीसांचा सत्ता स्थापनेचा खेळ लांबला

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -